Kavita Mazhi

Friday, February 27, 2026

 Not all wounds are so obvious; 

walk gently in the lives of others.




Wowwww! What a quote...  

              काय सुंदर quote आहे. काही quote अक्षरशः touch करून जातात मनाला आणि कुठे तरी मनात घुटमळत राहतात, उठत बसता तेच तुमच्या background मध्ये slogan सारखे चालत राहतात. असं जेव्हा होत त्या मागचं काय बरं कारण असावं ?

             जीवन अवघड ही नाही आणि सोपं ही नाही. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे नित्याचेच, पुढे वाटचाल करत राहणं हे मात्र खरं. पण चालत असताना खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात तर नवीन फण्डे अवगत करावे लागतात. त्या परिस्थितीला सामोरे जातांना आयुष्यात येणाऱ्या माणसांचा फार मोलाचा वाटा असतो. बिकट परिस्थितीतून जातांना सहाय्य करणारी आणि खोचट बोलणारी, हसणारी, आणि मज्जा बघणारे ही सगळीच लक्षात राहतात अगदी शेवट पर्यंत.
 
             काही दुःख / जख्मा इतक्या deep असतात, काळीज कापणाऱ्या त्याचा अंदाज लावू शकत नाही. दुःख छोटं मोठ हे प्रत्येकावर अवलंबून असत, त्याचा impact माणसा माणसापरी वेगवेगळा असतो. काही माणसं फारच हळवी, भावनाप्रधान, असतात तर काही निर्भीड, निडर तर सामर्थ्यवान असतात.
             या quote मध्ये म्हटल्या प्रमाणे, Not all wounds are so obvious (सर्व जखमा इतक्या स्पष्ट नसतात), कोणत्या दुःखाचा / जखमेचा कोणावर काय प्रभाव पडतो, हे ओळखता येणं कठीण आहे. काळानुरुप त्या जख्मा बऱ्या होतात, किंवा विसरून ही जातात. पण काही जख्मा असतात त्या थोड्या धक्याने भळभळा वाहू लागतात, तर काही प्रसंग पुन्हा गतकाळात नेऊन सोडतात. ती व्यक्ती पुन्हा त्या चक्रव्युवात गोवली जाते, त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जात.
कोणाच्या बोलण्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही, असं वरवर आपण कितीही दाखवायचा प्रयत्न केला, तरी त्या गोष्टी मनात घर करून राहतात.
काही अबोल वाटणाऱ्या व्यक्ती मनात वादळ घेऊन वावरत असतात त्याला हे ही एक कारण असावं. व्यक्तीपरी वागण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. मागचा पुढचा विचार न करता जेव्हा कळत नकळत आपण एखाद्यावर हसतो, जोक करतो, त्या व्यक्तीवर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता. असं बेपर्वा वागणं किती घातक ठरू शकत याचा विचार आपण करत नाही.

जीवनाची समीकरण वयानुसार अनुभवानुसार परखड होत जातात. ही परिपक्वता काहींमध्ये लवकर येते तर काहींना वेळ लागतो. दुसऱ्याच्या सांगण्यावरून प्रभावी होतो आणि पटकन पुढच्याला judge करून मोकळे होतो. पण हे लक्षात घेत नाही प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या विचारांवर प्रभाव पडणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कार, मित्र मैत्रीण, घर ऑफिस मधील वातावरण, नातेवाईक, आणि समाज ह्या फार मॅटर करतात.
म्हणूनच दुसऱ्यांशी बोलतांना, वागताना आणि सामाज्यात वावरताना अतिशय काळजीपूर्वक वागायला पाहिजे. स्वतःच्या भावना दुःखू नये असं आपल्याला वाटत मग दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायचा अधिकार आपल्या हातात घेऊ नये. शब्द हे शस्र आहे त्याचा वापर जपून करायचा असतो. कुणाला घायाळ करण्याचा अधिकार आपल्याला नाही
थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या गोष्टींची उत्तर तुम्हाला दिसतील, मिळतील. 

Tuesday, August 19, 2025

 तो क्षण

आतुरलेला आसवांमध्ये मुक्त न्हालेला
साठव मणभर करीती कल्लोळ
अव्यक्त मनाच्या कप्यामध्ये
तो क्षण निवांत सुखावलेला

क्षणात सुख दुःख जन्माचे
किती पाढे गावे जीवनाचे
अधीर मन बधिर तन
आस लाविती पुन्हा पुन्हा

अनंताचे शब्द साथी
कधी मावती ओजळीं मध्ये
अधीर होऊन पुन्हा पुन्हा
ओघळती कधी नयना वाटे

क्षणात यावे कवेत घ्यावे
पुलकित व्हावे पुन्हा पुन्हा
उजळून जावे गाणे व्हावे
ओसांडीत पाऊलखुणा

वाट नेई  दूर देशी
पुरून टाकी खाणाखुणा
पुन्हा फुलावे फुलून उरावे
ते क्षण जगावे पुन्हा पुन्हा

Monday, October 16, 2023

 मृगजळ

ही स्वप्नवेडी माया
कंठात दाटून येते
नाही नाही म्हणता
जाळ्यात गोवून नेते

हे पाश मोहबंधाचे
बिलगून घेती कुशीत
हळूच करकचून
घेती जीव मुठीत

हा भावाभोळा वाटे
का मृगजळाचे काटे?
उमगावे कसे कशास
मनानंद्ध काहूर दाटे

हा वेडा खेळ सारा
नेई अलवार वाहून
परतण्या मार्ग नाही
जीवात्मा जातो गुंतून

कालचक्र जन्मगतीचे 
फिरते एकामागून एक
मोक्षबिंदू दूर भासे
डुबलो पुरता त्यात

Savita BK

 छंदोरचना

वृत्त.....पादाकुलक 8 + 8
मा. समुपदेशक- श्री राजेंद्र उगले

सागरतीरी वाळूवरती


सागरतीरी वाळूवरती
लपलप लाटा खेळ खेळती
थंड गारवा स्पर्श मखमली
सरसर काटा अंगा वरती

माडांची ही सळसळ भारी
मनात विजोड हर्ष उभारी
संध्याकाळी दिशा फुलल्या
अवकाशाचा रंग केशरी

वाळूमध्ये पाय माखुनी
चालू लागे मन माघारी
सोनपावले आठवणींची
अलगद येती मनी दाटूनी

कातर वेळी मन एकांती
गत काळाची ओढ वाढवी
सागरतीरी भेट आपली
झाली होती एके काळी...

सविता ब कुंजीर (Savita BK)
राऊ समूह

 श्रीकृष्ण शरम :

शब्दमय श्रीहरी म्हणजे भागवत होय...

दिवाकर अनंत घैसास लिखित श्रीमत भागवत सार हा आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. शब्दनं शब्दातून ओसांडणारा प्रकाशरूपी कवडासा हृदयातील भगवंताची चतुर्रभुज मूर्ती जागृत करते. श्रीमत भागवत हे परमतत्वाशी जोडण्याचा दुवा आहे, विष्णू भक्तांच्या भक्तीचा अथांग सागर आहे. विष्णूभक्तांच्या भक्तीप्रेमात न्हावून निघताना हृदयाचा कोपरा अन कोपरा द्रवल्याशिवाय रहात नाही.

सर्वसाक्षी विष्णुचे दशावतार तुमचं चित्त स्थिर
करून कमर्बंधनातून मुक्तीचा मार्ग दर्शवितात.
कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग व्यासांनी आपल्यासाठी मोकळा करून दिला आहे. त्या कल्पतरूरुपी अतिमधुर फळाची अवीट गोडी जीवनाच्या मोह मायेतून मुक्ती मार्गस जाण्यास प्रवृत्त करून निवृत्तीचा मार्ग दाखवते. तन्मय होऊन त्या अथांग समुद्रात आपण मूक्तपणे विहार करू लागतो. तन मन हलक होतं आणि अश्रू भक्तीरूपाने मूक्त होतात, शब्द, भावना आणि मन  स्थिर होऊन मुकपणे वास्तवाशी समरस होण्यास स्फूर्ती प्रदान करतात.

मुक्तिमार्गाच्या वाटेला लागल्यानंतर प्रभुशी एकरूप होण्यापेक्षा, त्यानं दिलेलं हे जीवन आत्तापासूनच परमात्याशी एकरूप व्हावं असं मला वाटतं.

भागवताची बारा स्कंधामध्ये विभागणी केली आहे. संस्कृत पुरणातील गहन तत्वज्ञान, वंशपरंपरेची विस्तृत माहिती यात वर्णनिल्या आहेत. दशम स्कंधात कृष्णअवतारलीला वर्णली आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेलं भागवत म्हणजे कलियुग वासियांसाठी मुक्तिधामाचा मार्गच आहे.
भगवताच्या अथांग सागरातून रसग्रहण करताना
ओजंळरुपी ज्ञान आपल्या माया मोहाच्या जाळीतून पटकन निसटून जात. त्याला साठवून ठेवायला ओंजळ घट्ट करावी लागते. मोह मायेच्या जाळ्याला बांध घालावे लागतात. हे करण्यासाठी सातत्य ठेवून निरंतन भागवताच्या डोहात डुंबावं लागत.

विष्णुभक्तांच्या विविध कथा शुकदेवांनी
परीक्षिताला सांगितल्या. राजा भरत, ध्रुव,पृथु अजामीळा, प्रहाद, सुदामा, ऋषभदेव याच्या भक्ती प्रवास सांगितला असून, भक्तीच्या विविध छटा त्यातून आपल्याला दिसून येतात. या भक्तांनी परमेश्वर प्राप्ती साठी केलेले प्रयास आपल्या खुज्या प्रववृत्तीची जाणीव करून देतात. सकाम भक्ती ध्रुवाची होती, निष्काम भक्ती पृथुराजाची, पृथु राजाला साक्षात श्रीहरी प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितलं. राजा म्हणाला मला तू वरदानाच आमिष दाखवून या संसार चक्रात गोवू नको, दिलाच तर तूझ्या भक्तीच निरंतन दान दे. सुदामा मागूच शकला नाही आणि त्यानी त्याला कमी पडू दिल नाही. जस भक्तांच्या मनात सतत नारायणाच स्मरण असतं तसंच आपल्या भक्तांच स्मरण हरिच्या हृदयात चालू असतं. कृष्ण म्हणतो एक वेळ मी रुक्मिणीला विसरेन पण माझ्या भक्तांना नाही. तुम्ही समजून जा आणि त्याच्या प्रेममयी विश्वात स्वतःला सहभागी करून घ्या. Savita B Kunjir