Kavita Mazhi

Wednesday, April 12, 2023

 देवा तू आला नाही


देवा तू आला तरी, भेटल्या सारखा वाटलं नाही
सगळ्यांच्या घरी आला पण, माझ्या घरी आला नाही

माझा छकुला बघत होता, रोज तुझी वाट
त्याला उत्तर देता देता, लागली माझी वाट

तुझ्या आगमनाची केली होती, जय्यत तयारी
बसायला सिंहासन अन, नेसायला पिवळा पितांबर भारी
 
तुला सुंदर दिसला असता, हिऱ्यांचा मुकुट
सोन्याची कंठी घातल्यावर, दिसला असता उठून

तुझ्या स्वागताला आणले होते, ढोल लेझीम ताशे
रोज रोज करणार होते, तुपातली मोदक सारे

तुझ्या आरतीमूळे, मन आलं असत भरून
तुझ्या आगमनाचा आनंद, दिसला असता डोळ्यांतून

सगळी तयारी केली देवा, काय चूक झाली
माझ्या घराची वाट तुला, का नाही गावली ?

खर खरं सांग देवा, काय आमचं चुकलं
माझं घर चुकवून, तू का प्रस्थान केलं ?

भक्तांचा कैवारी तू, चुकलं आमचं माफ कर
पुढच्या वर्षी तरी देवा, माझ्या घरी आगमन कर
पुढच्या वर्षी तरी देवा, माझ्या घरी आगमन कर

No comments:

Post a Comment